हा लेख कविसंमेलनावरच आहे. ‘पुन्हा’ आणि ‘शेवटचे’ या शब्दांना तसा अर्थ नाही. पुलंनी 1975 साली ‘शेवटचे कविसंमेलन’ हा लेख लिहिला होता. नंतरच्या पंचेचाळीस वर्षात काय कमी कविसंमेलने झाली? आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे निवडणुका झाल्या तेव्हा विरोधकांनी त्यांना ‘स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ म्हटले. कावळय़ांना म्हणे एक ते पाच इतकेच अंक मोजता येतात. त्या चालीवर राजकारण्यांना एक ते दोन इतकेच अंक मोजता येत असतील. असू देत.
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही. म्हणून सोशल मीडियावर फेरफटका मारला. एका भिंतीवर कविसंमेलन चालले होते. पुलंच्या लेखातील धोटे सर ऊर्फ धोटे बाईंचे अपत्य शोभेल अशी एक विभूती ‘लाईव्ह’ येऊन गात होती.
‘घेई छंद, मकरंद, धुण्याभांडय़ांचा’
दुसऱया भिंतीवर आधुनिक श्याम आणि आईवडील जेवायला बसले होते. जेवता जेवता काव्य शास्त्र विनोद चालले होते. टाळेबंदीमुळे त्यांच्या भागात मिठाची टंचाई होती. आज भाजीत मीठ कमी पडले होते. वडील काही मूळ कथेतल्या श्यामच्या वडिलांसारखे सोशिक नव्हते. त्यांनी पत्नीला ‘ते मीठ तुझ्या सटातले’ मागितले. ती म्हणाली,
‘मीठ मागशी सख्या, परी, मिठाचे सट पडले रिकामे’
पुढच्या भिंतीवर एक चारोळीकार धडाधडा चारोळय़ा पाडत होते. लबाड दुकानदार वनस्पती तुपात तळलेला माल साजूक तुपातला म्हणून खपवतात तसे हे गृहस्थ. आपल्या चारोळय़ांना रुबाया म्हणतात. त्यांचा नुकताच प्रेमभंग झाला असणार. कितवा ते विचारू नका. कवी म्हणवणारे लोक आपले प्रेम आणि प्रेमभंग मोजत नाहीत. ते फक्त (शक्मय झालं तर) आपल्या पद्य रचनेतल्या लघु-गुरु मात्रा मोजतात. तर या सद्गृहस्थांनी नवी चारोळी पाडायला सुरुवात केली होती.
ती दाद देणार असेल तर शेर लिहायला अर्थ आहे,
ती लक्ष देणार नसेल तर गझल देखील व्यर्थ आहे.
त्यांची चारोळी पूर्ण न वाचताच मी पुढच्या भिंतीकडे वळलो.
‘लाईव्ह’ आलेले जोडपे स्वयंपाक करीत होते. एका शेगडीवर भाजी शिजत होती. ती पोळय़ा लाटत होती, तो त्या तव्यावर नीट भाजून खाली उतरवून तूप लावून घडी करून ठेवत होता. दोघे स्वतःशी गुणगुणत होते. शब्द ऐकू येत नव्हते. पण ते एकूण चित्रच मला सुंदर कवितेसारखे वाटले.