आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे आवाहन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, महापालिकेच्या यंत्रणेची सज्जता
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी महापालिकेने सज्जता ठेवली आहे. नागरिकांनीही पुन्हा लॉक डाऊन नको असल्यास कोरोनाचे नियम पाळण्याबरोबर काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
15 नोव्हेंबरला महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्यानंतर आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापूरकारांचे आरोग्य, अखंडीत पाणी पुरवठा या दोन अत्यंत महत्वाचे विषय आपल्या अजेंड्यावर असतील. त्याचबरोबर शहराच्या विकासाचे प्रकल्प, योजना पूर्ण करण्यावर आपला भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज केली असल्याचे सांगून आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, सध्या शहरात दोन टक्के कोरोना पॉझिटिव्ह आहे. रूग्ण संख्या घटली असली तरी सावध राहण्याची गरज आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रबोधन, जनजागृतीबरोबर दंडात्मक कारवाईही सुरू आहे. गर्दी होणाऱ्या दुकानांना दंड केला जात आहे. पण यामध्ये नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळणे, काळजी घेणे आवश्यक आहे.
10 टक्के रूग्णवाढ गृहित धरून उपाययोजना
कोरोनाच्या दुसऱया लाटेत दहा टक्के रूग्णवाढ गृहित धरून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुसरी लाटसाठीशासनाची मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. 10 टक्के रुग्ण वाढ लक्षात घेऊन उपाय योजना सुरू आहे. वॉक टेस्ट घेतल्या त्यातून 303 जणांची तपासणी केल्यावर 19 पॉझिटिव्ह आले. खबरदारी म्हणून नियोजन केले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यास अथवा त्रास झाल्यास तातडीने प्राथमिक टप्प्यात उपचार घ्यावेत. मृत्यूदर कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहनही आयुक्त डॉ. बलकवडे यांनी केले.
आरटीपीसीआरच्या दररोज 200 टेस्ट
दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार दररोज 75 आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. पण कोल्हापूर महापालिकेतर्फे दररोज अशा 200 ते 250 टेस्ट केल्या जात आहे. पोस्ट कोव्हीड सेंटरमध्ये आतापर्यंत 63 जणांनी लाभ घेतला आहे. त्यांना तेथे उपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जात आहे.
डेंग्यू, मलेरिया रोखण्यावही भर
कोरोनाबरोबर शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रार्दुर्भावाचा धोका आहे. तो रोखण्यावर भर दिला आहे. आरोग्य यंत्रणा त्यासाठी कार्य करत आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही, थेट फौजदारी
शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना सुविधा देण्यासाठी महापालिका आहे. तेथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. भ्रष्टाचार करणारे कुणीही असो त्याच्यावर कायदेशीर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिला.
त्या म्हणाल्या, महापालिकेच्या प्रशासनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला तर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींना अभय देण्याचा कुणीही प्रयत्न केला तर तो देखील सहन केला जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. घरफाळा घोटाळा प्रकरणी झालेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
फिरतीच्या नावाखाली काम टाळणाऱयांवर कारवाई
महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी फिरतीच्या नावाखाली आपले काम टाळून इतरत्र फिरत आहेत. त्याचबरोबर काही जण वेळेत कामावर येत नाही, अशा तक्रारी वाढत आहेत. त्याचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सध्या कोरोनामुळे बायमॅट्रिक प्रणालीने हजेरी काही काळासाठी बंद केली आहे, पण त्याचा लाभ उठवित कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी लवकरच बायोमॅट्रिक प्रणाली सुरू करण्याचा मानस आहे. तो पर्यंत कामासाठी बाहेर जात असल्याच्या नेंदी ठेवणारे रजिस्टरही ठेवण्याचे आदेश दिले आहे, असे आयुक्त डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.
फटाक्यांसंदर्भात नियमानुसार कारवाई
दिवाळीच्या काळात ग्रीन फटाके विक्री करण्यासंदर्भात शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही निर्देश दिले आहे. नियमानुसार नसलेले फटाके विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फटाके विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्याच्या कोरोनाच्या काळात हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके घातक आहेत. ते वापरणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहनही आयुक्त डॉ. बलकवडे यांनी केले.
नगरसेवकांकडून दिल्या जणाऱ्या मयतांच्या दाखल्यासंदर्भात निर्णय घेऊ
महापालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपल्यानंतर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे सूत्रे जाणार आहे. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नगरसेवकांकडून भागातील एखादी व्यक्ती मृत झाल्यास दिला जाणारा जाणारा मयताचा दाखला नवे सभागृह अस्तित्वात येईपर्यंत कोण देणार ? या विषयी पत्रकारांनी छेडले असता आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, ही समस्या प्रशासन गंभीरपणे घेईल. तातडीने या संदर्भात जबाबदारी निश्चित करून तोडगा काढला जाईल. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता प्रशासन घेईल.
आयुक्त काय म्हणाल्या….
-शहरातील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी आराखडा तयार केला जाईल.
-बंद असलेल्या महापालिकेचे दुकानगाळे भाड्याने देवून उत्पन्नवाढीचे प्रयत्न केले जातील.
-महापालिकेच्या जुन्या दुकानगाळ्यांच्या भाडे प्रश्नी माहिती घेऊन मार्ग काढला जाईल.
-रोजंदारी कर्मचऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील.
-महपालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन शिबीर आयोजनाचा प्रयत्न.
-थेटपाईप लाईन, अमृत योजनेची कामे पूर्णत्वावर भर
-शहरातील रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. उर्वरीत कामेही आचारसंहितेनंतर सुरू करणार
-कोल्हापूरची स्वच्छ शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील.
-दिवाळीत ग्रीन फटाके वगळता इतर फटाक्यांची विक्री करणाऱयांवर जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानुसार कारवाई करणार.
-दिवाळीचा आनंद उपक्रमांनी साजरा करण्यासाठी रक्तदान आणि प्लाझादान शिबिराचे आयोजन