स्पेनमधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य जिंकल्यानंतर किदाम्बी श्रीकांतची प्रतिक्रिया
हैदराबाद / वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये काही वेळा दुखापतीमुळे तर काही वेळा पात्रता स्पर्धा रद्द झाल्याने किदाम्बी श्रीकांतला पात्र ठरता आले नव्हते. पण, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतरही पुन्हा मुसंडी मारता येईल, याची खात्री होती, असे हा दिग्गज बॅडमिंटनपटू म्हणाला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य जिंकून मायदेशी परतल्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता.
‘ऑलिम्पिकमध्ये पात्रता संपादन करता आली नाही, ते साहजिकच निराशाजनक होते. वास्तविक, मी त्यावेळी देखील भारताचा अव्वलमानांकित होतो. काही पात्रता स्पर्धा होणे अपेक्षित होते. पण, पहिल्या टप्प्यातील काही स्पर्धांमध्ये मी दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकलो नाही आणि नंतर मी पूर्ण तंदुरुस्त झालो, त्यावेळी 7 ते 9 स्पर्धा रद्द झाल्या. पात्रता स्पर्धाच रद्द झाल्याने त्यावर काहीही करता येण्यासारखे नव्हते. पण, ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवता आली नाही, हा काही जगाचा शेवट नाही, हे मी स्वतःवर बिंबवले. मेहनत घेण्यात सातत्य राखले तर एक दिवस निश्चितपणाने मुसंडी मारता येईल, यावर माझा विश्वास होता आणि ते वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रत्यक्षात साकारता आले’, असे श्रीकांत तपशीलवार बोलताना म्हणाला.
आंध्र प्रदेशमधील गुन्टूर येथील रहिवासी असणारा श्रीकांत माजी अव्वलमानांकित असून प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य जिंकणारा भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे. ऐतिहासिक रौप्य जिंकून मायदेशी परतल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. आता पुढील वर्षात हाच फॉर्म कायम राखत ऑल इंग्लंड, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्याने येथे नमूद केले.
‘पुढील 8 ते 10 महिने माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे असतील आणि मी प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून याबाबत टीप्स घेत आहे. मागील काही महिन्यात जेथे चुका झाल्या, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, यावर माझा भर असेल’, याचाही त्याने उल्लेख केला.
स्पेनमध्ये झालेल्या अंतिम लढतीत सिंगापूरचा प्रतिस्पर्धी लोहविरुद्ध श्रीकांत एकवेळ 9-3 अशा भरभक्कम आघाडीवर होता. मात्र, नंतर अचानक तो 18-16 असा पिछाडीवर पडला. याच पिछाडीमुळे त्याची विजयाची संधी वाया गेली. मात्र, रौप्यही ऐतिहासिक असल्याने त्याने याबद्दल समाधान व्यक्त केले.
‘वास्तविक, या पदकाचा आनंद साजरा करण्यासाठीही वेळ नाही, अशी स्थिती आहे. दि. 10 जानेवारीपासून इंडिया ओपन सुरु होत असल्याने त्याची तयारी सुरु केली आहे. मार्चमध्ये ऑल इंग्लंड असेल. त्यानंतर राष्ट्रकुल, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई अशा बडय़ा स्पर्धा लागोपाठ असणार आहेत’, असे श्रीकांत पुढे म्हणाला.
श्रीकांतला चुका दुरुस्त करण्यावर भर द्यावा लागेल ः गोपीचंद
मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य जिंकणाऱया किदाम्बी श्रीकांतचे कौतुक केले. मात्र, याचवेळी 2022 मधील भरगच्च हंगामात त्याला चुका दुरुस्त करण्यावर भर द्यावा लागेल, अशी सूचनाही केली.
‘प्रत्येक स्पर्धेगणिक श्रीकांतचा खेळ सुधारत आला आहे, हे सुचिन्ह आहे. मात्र, अधिक सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारण्याकरिता त्याला आपल्या खेळातील चुका दुरुस्त कराव्या लागतील. ली जी जिया व केन्टो मोमोटाविरुद्ध लक्षवेधी खेळ साकारता आल्याने त्याचे मनोबल मागील काही कालावधीत उंचावले’, असे गोपीचंद पुढे म्हणाले. श्रीकांत आता राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीतील आपले जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. शिवाय, मिश्र दुहेरीतील सुवर्ण कायम राखण्याच्या मोहिमेत त्याचा वाटा अर्थातच मोलाचा ठरणार आहे.
यापूर्वी, 2017 मध्ये 5 फायनल्समधून त्याने 4 सुपर सिरीज टायटल्सवर आपली मोहोर उमटवत ली चोंग वेई, लिन डॅन व चेन लाँग यांच्या मांदियाळीत स्थान प्राप्त केले. मात्र, गुडघ्याची दुखापत झाल्याने त्याला टोकियो ऑलिम्पिक पात्रता मोहीम अर्ध्यावर सोडून द्यावी लागली होती. आता त्याने ताज्या दमाने सुरुवात करत वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील ऐतिहासिक पदक जिंकत आपल्या उत्तम तयारीचा दाखला दिला आहे.