ऑनलाईन टीम / रोहतक :
बलात्कार प्रकरणातील दोषी आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची तब्येत आज पुन्हा एकदा बिघडली असून त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीम यांची तब्येत पुन्हा खालावल्याने त्याला मंगळवारी सकाळी 5 वाजता तुरुंगातून दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यानंतर त्याची एमआरआय करण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना एका डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्यावर एडॉस्कॉपी केली जाणार आहे. यासोबतच अजून किती दिवस रुग्णालयात ठेवले जाणार याबबत त्याची तब्येत पाहून निर्णय घेतला जाईल. जिल्हा पोलिसांची विशेष टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.
दरम्यान, यापूर्वी 12 मे रोजी देखील रक्तदाबाची समस्या जाणवत असल्याने त्याला पीजीआयमध्ये नेण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच आई नसीब कौर या आजारी अडल्याने त्यांना गुरुग्रामला जाऊन भेटण्यासाठी राम रहीमने 21 दिवसांचा पॅरोल मागितला होता. परंतु, त्याला केवळ 48 तासांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
53 वर्षीय राम रहीम याला आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बलात्कार प्रकरणात पंचकूला स्थित सीबाआय विशेष न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तो 2017 पासून रोहतकच्या तुरुंगात बंद आहे.









