सभा झालेल्या 52 पैकी 42 मतदारसंघांमध्ये महाआघाडी अपयशी
बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रालोआचे बहुमत गाठले आहे. तर महाआघाडीला सत्ता प्राप्त करण्यास अपयश आले आहे. सीमांचलमध्ये महाआघाडीला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी फ्लॉप ठरले आहेत.
52 मतदारसंघांवर प्रभाव पाडणाऱया 8 ठिकाणी राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली होती. या 52 मतदारसंघांमध्ये महाआघाडीला स्वतःचा प्रभाव पाडलेला नाही. केवळ 10 मतदारसंघांमध्ये महाआघाडीचे उमेदवार विजयी ठरले आहेत. अशा स्थितीत राहुल गांधी यंदाही बिहारमध्ये प्रभावहीन ठरले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांच्या टीमने राज्यभराचा दौरा केला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी या निवडणुकीकरता 59 सभा घेतल्या होत्या. यातही राहुल गांधी यांनी प्रत्येक टप्प्यात दोन तर तिसऱया टप्प्यात 4 म्हणजेच एकूण 8 प्रचारसभा घेतल्या होत्या. राहुल यांनी पहिल्या टप्प्यात हिसुआ आणि कहलगावमध्ये सभा घेतली होती, तर दुसऱया टप्प्यात कुशेश्वरस्थान तसेच वाल्मीकिनर तर तिसऱया टप्प्यात कोढा, किशनगंज, बिहारीगंज तसेच अररियामध्ये प्रचारसभांना संबोधित केले होते.









