संततधार पावसामुळे सखल भागात पाणी : अजूनही दमदार पावसाची नितांत गरज
प्रतिनिधी /बेळगाव
जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने सध्या दडी मारली होती. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला होता. मात्र, आता रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी संततधार पडला. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. भातपिकाला तसेच इतर पिकांनाही जीवदान मिळाले असून अजूनही पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकऱयांतून सांगण्यात आले.
सोमवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली. त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचले होते. सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे घरांतून बाहेर पडताना रेनकोट तसेच छत्रींचा आधार घ्यावा लागला. बाजारपेठेतही त्यांचा आधार घेऊनच खरेदी करावी लागत होती. संततधार पावसामुळे बैठे व्यापारी तसेच फेरीवाले यांची तारांबळ उडाली. सकाळच्या सत्रात पाऊस झाला तरी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. भात लागवड (नट्टी) करण्यासाठी मोठय़ा पावसाची गरज असून शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
बळ्ळारी नाला परिसरातील शिवारात पुन्हा पाणी
जूनमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पूर आला होता. अजूनही काही ठिकाणी पाणी साचून होते. त्यातच सोमवारी पावसाची संततधार सुरू झाल्याने पुन्हा शिवारामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे काही शेतकऱयांनी दुबार पेरणी केली होती. त्यांनाही फटका बसला आहे. काही शेतकरी पेरणीच्या तयारीत असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने त्यांचे काम खोळंबले आहे.









