जागतिक महामारीचे कोरोनाचे संकट संपत आले असे वाटत असतानाच संकटाच्या शेपटाने तडाखा द्यायला सुरुवात केली आहे. शनिवारी एका दिवसात देशभर 24,882 रुग्ण नोंदले गेले आणि त्यातील निम्याहून अधिक म्हणजे 15,602 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. नागपूर, पुणे, मुंबई, नांदेड येथे कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली आहे. गेल्या मार्चमध्ये हे संकट घोंगाऊ लागले. त्यानंतर लॉकडाऊन, स्थलांतर, बेरोजगारी, मृत्यूचे तांडव आणि मडय़ाच्या टाळूवरील लोणी खाणारी प्रवृत्ती यांचे जसे दर्शन झाले तसे सेवा, संयम, सहकार्य, जबाबदारी, कर्तव्य यांचीही प्रचिती आली. भारतात एक कोटी तेरा लाख लोकांना आजवर लागण झाली आणि दीड लाखाहून अधिक नागरिकांचा बळी गेला. यातील 50 हजार महाराष्ट्रातील आहेत आणि आता पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली असताना पुन्हा महाराष्ट्रातच कोरोनाचा सर्वाधिक नंगानाच सुरू आहे आणि तो धडकी भरवणारा आहे. अशोभनीय आहे आणि प्रगत म्हणून पाठ थोपटून घेणाऱया सर्वांना लाजीरवाणा आहे. देशभरात जवळपास अडीच कोटी लोकांनी लस घेतली आहे. काल एका दिवसात वीस लाख लोकांनी लस घेतली. लसीकरणाचा हा कार्यक्रम जोरात सुरु आहे. त्याचवेळी शास्त्राrय आणि औद्योगिक संशोधन परिषदेने तुर्तास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाही अशी दिलासादायक बातमी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लस व आंतर नियम पाळून कोरोनावर नियंत्रण शक्य आहे असे या परिषदेने म्हटले आहे. जागतिक तुलनेत आपली स्थिती बरी असली तरी काळजी ही घ्यावीच लागणार आहे. लस घेतली की कोरोना प्रतिबंधाचे कवचकुंडल चढले अशा भ्रमात कुणी राहू नये. लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून दोन अडीच महिन्यांनी लस घेणाऱयाच्यात प्रतिकार शक्ती तयार होते. पण मास्क, सॅनिटायझर आणि पाच फुटाचे अंतर, स्वच्छता अनिवार्य आहे. पण याचे भान अनेकांना उरलेले नाही. निवडणुका असोत, राजकारण असो, समारंभ अथवा परीक्षा, माणसे नियम डावलताना दिसत आहेत. परिणामी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. अनलॉक झालेला महाराष्ट्र काही भागात अंशतः तर काही भागात पूर्ण लॉक झाला आहे. पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी, सायरन वाजवत घोंगावणाऱया रुग्णवाहिका, आप्तांचे मृत्यू आणि आप्तांच्या दृष्टीआड करावे लागणारे अंत्यसंस्कार हा सिलसिला सुरू झाला आहे आणि त्याला तुम्ही-आम्ही सर्व जबाबदार आहोत. गेल्या मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळला. निदान या मार्चपर्यंत कोरोनामुक्ती गरजेची होती पण मार्चने पुन्हा दहशत निर्माण केली आहे. कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे आणि कुणीच या संदर्भात गंभीर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पुन्हा लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका’ असे वारंवार म्हटले आहे. पण राजकीय नेत्यापासून आम जनतेपर्यंत सारेच या प्रश्नी म्हणावे तितके गंभीर नाहीत. मंत्रीपद वाचवण्यासाठीचे शक्तीप्रदर्शन असो अथवा परीक्षा घ्या मागणीसाठीचे आंदोलन असो. आठवडय़ाचे बाजार असोत किंवा पब, बार मधली गर्दी कुठेही गांभीर्य नाही. भान नाही. गर्दी वाढते आहे. नियम पायदळी तुडवले जात आहेत. ओघानेच कोरोनाने पुन्हा बाळसे धरायला प्रारंभ केला आहे. पुन्हा लॉकडाऊन केला तर अडचणीतील अर्थव्यवस्था पुन्हा खड्डय़ात जाणार आहे. महागाईचा डोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या बरोबरच डाळी, तांदूळ, तेल, कांदा अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अनेकांना निम्म्या पगारावर काम करावे लागते तर अनेकांना घरदार विकून मूळ गावी भाजीपाला विक्री वा तत्सम उद्योग पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागतो आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक 50 हजाराचा टप्पा पार करत असला तरी भाकरीचा, नोकरीचा व जगण्याचा संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या मार्चनंतर कोरोना वाढत गेला आणि ऑगस्टमध्ये कोरोनाचा कहर झाला. रुग्णांना खाट मिळेना. उपचारासाठी काहींची आयुष्याची पुंजी खर्च झाली. अनेक जण रस्त्यावर आले. अनेकांनी या संकटात सारे गुंडाळून ठेवून उभा-अडवा हात मारला. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी, पदाधिकारी यांनी गैरव्यवहार केले. त्या सर्वांचा पंचनामा अजून झालेला नाही. पण जग आणि माणूस संकटात असताना कुणी काळाबाजार केला, कुणी लॉकडाऊनमध्ये तेल-तांदूळ महाग विकला, कोणत्या हॉस्पिटलने अव्वाच्या सव्वा बिले आकारली यांची नोंद गावोगावी जनसामान्यांच्या हृदयावर कोरली आहे.बेफिकिरी, नियमांचे उल्लंघन यामुळे कोरोनाची धास्ती वाढली आहे. रोजचे आकडे धडकी भरवत आहेत. काही राज्यात निवडणुका आहेत. दहावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. विधीमंडळ अधिवेशनातही कोरोना मुक्तीसाठी काही ठोस व एकमुखाने सामुदायिक निर्धार व्यक्त झाला असे दिसले नाही. जो तो राजकारण साधण्यात आणि एकमेकांची उणी-दुणी काढून धुणी-धुण्यात गर्क दिसला. लोकही गंभीर नाहीत. सरकार गंभीर व वचक ठेऊन नाही आणि यंत्रणा आपल्या मनमानीत गुंग आहे. अशावेळी धडकी भरवणारे आकडे येऊ लागल्याने धास्ती निर्माण झाली आहे. सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. लसीकरण करून घेतले पाहिजे आणि कोरोनाची त्रिसूत्री जीवन सवय म्हणून स्वीकारली पाहिजे. सावधान होण्याची हीच वेळ आहे. संशोधन संस्थेच्या अंदाजाप्रमाणे दुसरी लाट न येवो पण ती येणार नाही असे गृहीत धरून बेफिकीर राहणे महागात पडणारे आहे. अखंड सावध राहिले पाहिजे आणि कोरोनापासून संपूर्ण मुक्ती मिळवली पाहिजे.
Previous Articleउत्तराखंडमधील बदल,भाजपपुढील आव्हाने
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









