दोन मुलींचे ओढणीने बांधलेल्या अवस्थेत शेतात आढळले मृतदेह : आणखी एका मुलीची मृत्यूशी झुंज
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एका शेतात दोन मुलींचे मृतदेह आढळले असून तिसऱया मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी होत असून राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे. तसेच उन्नावमधील या हत्याकांडप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचार हे आता एक समीकरण बनत चालले आहे. राज्यात रोज महिला अत्याचारावरील घटना समोर येत आहेत. त्यातच आता उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. असोहा पोलीस स्थानक परिसरातील बबुरहा या गावात भयंकर घटना घडली आहे. या घटनेवरून राजकारण तापले असून राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, दलित संघटना आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रुग्णालयात दाखल मुलीला चांगले उपचार मिळावेत यासाठी एम्समध्ये दाखल करावे, अशी मागणी केली आहे.
चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला असून एकीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार डॉक्टरांनी विषप्रयोग झाल्याची लक्षणे दिसत असल्याचे सांगितले आहे. तसेच पोलिसांनी तपास सुरू असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. तपासासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, पोलिसांनी गावकरी आणि पीडित मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे. परिसरात शेती असल्याने आतापर्यंत तरी ठोस पुरावे शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.









