प्रतिनिधी/ बेळगाव
अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीनंतर रिक्त जागी कायमस्वरुपी शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने मागीलवेळी अनेक अतिथी शिक्षक बेरोजगार झाले होते. आता पुन्हा विभागनिहाय बदल्यांची प्रक्रिया पार पडणार असल्याने अतिथी शिक्षकांवर गंडांतर ओढवण्याची शक्मयता आहे.
2 ऑक्टोबरला प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाल्यानंतर शिक्षकांच्या कमरतेमुळे परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे लागलीच बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 776 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 1064 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, अवघ्या पंधरा दिवसांत त्यातील काही जागांवर कायमस्वरुपी शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. परिणामी, सुमारे 15 टक्के अतिथी शिक्षकांना घरी बसावे लागले होते.
दोन्ही जिल्हय़ात अनुक्रमे 1408 आणि 1935 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे दुसऱया टप्प्यात पुन्हा 177 आणि 244 अतिथी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होत आली असतानाच पुन्हा शिक्षकांच्या विभागवार बदल्या होणार आहेत. दि. 17 किंवा 24 तारखेला कौन्सिलिंग होणार आहे. अतिथी शिक्षक कार्यरत असलेल्या ठिकाणी एखाद्या शिक्षकाची नियुक्ती होण्याची शक्मयता आहे.
या बदल्या विभागवार होणार असल्याने तेवढा परिणाम होणार नाही, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. तरीही कुणाची ‘विकेट’ पडणार? अशा चिंतेत अतिथी शिक्षक सापडले आहेत.
आडातच नाही, तरीही…
आधीच अनेक शाळांना दुसऱया टप्प्यात अतिथी शिक्षक मिळालेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून अनुशेष (बॅकलॉग) भरला गेला नसल्याने बेरोजगारीत जगणारे डीएडधारक विविध व्यवसाय-नोकरीत गुंतले आहेत. अतिथींना वेतनही तुटपुंजे आहे. ते ही वेळेत मिळत नाही. त्यामुळे डीएडधारकांनी पाठ फिरविली आहे. ज्यांना नियुक्तीनंतर पुन्हा घरी बसावे लागले, त्यांना लांबच्या गावी जाणे परवडत नाही. परिणामी समस्या जटील बनली आहे.









