विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात : सभाध्यक्ष हेगडे-कागेरी यांच्याकडून दुखवटय़ाचा ठराव
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सोमवारी सुरुवात झाली. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. पहिल्या दिवशी पुनीत राजकुमार, सीडीएस बिपिन रावत, माजी राज्यपाल के. रोसय्या यांच्यासह अनेक मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षे बेळगाव येथे अधिवेशन झाले नाही. यंदाच्या अधिवेशनालाही विरोध होत होता. तरीही सरकारने तारीख जाहीर करून तयारी चालविली. सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवातही झाली. सकाळी 11.15 वाजता विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला. वंदे मातरम्नंतर सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी दुखवटय़ाचा ठराव मांडला. कर्नाटकाचे माजी राज्यपाल के. रोसय्या, माजी मंत्री एस. आर. मोरे, माजी मंत्री विरुपाक्षप्पा अगडी, माजी आमदार के. राम भट्ट, माजी आमदार डॉ. एम. पी. कर्की, सीडीएस जनरल बिपिन रावत व हेलिकॉप्टर दुर्घटनेत जीव गमावलेले 13 जण, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार, ज्ये÷ अभिनेते एस. शिवराम, बहुभाषा तज्ञ प्रो. के. एस. नारायणाचार्य यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, मंत्री के. एस. ईश्वरप्पा, निजदचे उपनेते बंडय़ाप्पा काशमपूर, टी. डी. राजेगौडा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, कायदा व संसदीय व्यवहारमंत्री मधु स्वामी, शिवलिंगेगौडा, कुमार बंगारप्पा, मंत्री शशिकला जोल्ले आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजता एक मिनिट मौन पाळून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अप्पुचे गुणगान
श्रद्धांजली वाहताना मंत्री शशिकला जोल्ले यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते पुनित राजकुमार यांचे गुणगान केले. आपला मोठा मुलगा ज्योतीप्रसाद हा दिव्यांग आहे. त्याला आम्ही प्रेमाने गुड्डू म्हणतो. एका कन्नड वृत्तवाहिनीने त्याच्यावर एक कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर आपला मुलगा कोडगू जिल्हय़ाच्या प्रवासाला गेला होता. त्यावेळी पुनित राजकुमारही तेथे आले होते. गुड्डूला पाहून ते चार पावले परत आले आणि त्याला विचारले, तुझे कार्य मी पाहिले आहे, असे सांगत त्याची पाठ थोपटली. त्यांना समाजकार्याची जाण होती.
हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीची मागणी
जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी व इतर सहकारी प्रवास करीत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, यावर विश्वास बसत नाही. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. सेनादलाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या अधिकाऱयाचा असा अपघाती मृत्यू होणे यातनादायक आहे. अपघात का घडला? याची चौकशी करण्याची गरज आहे. ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. अपघाताची निश्चित कारणे जनतेला समजली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनीही या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. विधिमंडळात चौकशीचा ठराव मांडून केंद्राला पाठवा, असा सल्ला आमदारांनी दिला.









