गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात एक प्रकारचे मंतरलेले, भारावलेले वातावरण बघायला मिळते. दरवर्षी जगभरातील गणेशभक्त, पर्यटक गणेशोत्सव अनुभवण्यासाठी शहरात येतात. गणरायांच्या आगमनाचा जल्लोष, आनंद गणेशभक्तांच्या मनात जेवढा असतो त्याहून अधिक उत्कट भावना श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीत दिसतात. 2020 वर्ष मात्र या आनंदोत्सवाच्या 129 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक बाबींसाठी अपवादात्मक राहिले, ते कोरोना विषाणूच्या संकटामुळे. या संकटकाळात अतिशय संयमाने उत्सव साजरा करणाघ्&या लाखो पुणेकरांना, डॉक्टर्स, पोलीस व पालिका प्रशासनाच्या अतुलनीय कामगिरीला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित आणि महेश लिमये दिग्दर्शित पुनरागमनाय च गणेशोत्सव 2020, एक उत्सव मनात राहिलेला या जनहितार्थ तयार केलेल्या डॉक्युड्रामा मधून सॅल्युट करण्यात आला आहे. या डॉक्युड्रामासाठी पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या डॉक्युड्रामा बद्दल बोलताना महेश लिमये म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच लाख घरगुती आणि साडेचार ते पाच हजार मंडळांच्या गाणपतींचे साध्या पद्धतीने विसर्जन झाले. यामुळे पुणेकरांच्या शिस्तीला ’सॅल्युट‘ आणि प्रशासनाचे आभार मानणारा डॉक्युड्रामा करावा अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन, लीड मीडियाचे विनोद सातव यांनी मांडली. यंदा पोलीस, पालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला गणेशभक्तांनी पाठींबा दिला. यंदाच्या वर्षी बाप्पा एका वेगळ्या प्रकारे अनुभवता आले, पण पुढच्या वर्षी वाजता गाजत या, दरवेळी जो थाट असतो तो तसाच राहुदे, ही भावना पुनरागमनाय च या टायटल मधून व्यक्त होते. 2020 चा गणेशोत्सव न भूतो न भविष्यती असा वेगळा ठरला भविष्यात 50 -100 वर्षानी जेव्हा हा डॉक्युड्रामा बघितला जाईल त्यावेळीही आजच्या परिस्थितीची जाणीव यातून होईल.
’पुनीत बालन स्टुडिओज‘ची जनहितार्थ निर्मिती असलेल्या ’’पुनरागमनाय च‘ या डॉक्युड्रामाची संकल्पना निर्माते पुनीत बालन, लीड मीडियाचे विनोद सातव यांची आहे, छायांकन आणि दिग्दर्शन बॉलीवूडचे सुप्रसिद्ध डिओपी महेश लिमये यांनी केले आहे तर क्षितिज पटवर्धन यांनी लेखन केले आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांचा भारदस्त आवाज व्हॉइस ओव्हरच्या रूपात ऐकायला मिळणार आहे. शॉर्टफिल्मला संगीत व पार्श्वगायन केदार भागवत यांचे असून संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.









