एटीएम, बँका सर्व ठप्प : सर्वत्र लांबच लांब रांगा
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला 7 दिवस झाले आहेत. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये युद्धामुळे विध्वंस घडून आला आहे. तर रशियावरही युद्धाचा प्रभाव दिसून येत आहे. रशियाची आक्रमकता पाहता अमेरिकेसह जवळपास सर्वच पाश्चिमात्य देशांनी त्याच्यावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाच्या बँकांवर कठोर निर्बंध आल्याने त्यांच्या ग्राहकांना मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. डॉलरच्या तुलनेत रशियन चलन रुबलमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
रशियात श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना रोख रक्कम मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय. रशियाच्या बँकिंग व्यवस्थेवर पाश्चिमात्य निर्बंधांमुळे रशियाची आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली आहे. खाद्यकिमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याने रशियातील सर्वसामान्य नागरिक घायकुतीला आला आहे.
रशियाच्या चलनात घसरण झाल्याने सर्वसामान्यांची बचत प्रभावित झाली आहे. हताश नागरिक स्वतःचे पैसे काढण्यासाठी एटीएमच्या लांब रांगांमध्ये दिसून येत आहेत. अमेरिकेने पाश्चिमात्य देशांमधील रशियन मध्यवर्ती बँकांची मालमत्ता गोठविली आहे. रशियाला जागतिक बँकिंग सिस्टीम ‘स्विफ्ट’ प्रणालीतून वगळण्याचा विचार सुरू आहे. यामुळे रशियाला प्रतिदिन प्रचंड नुकसान झेलावे लागत आहे. रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडला पूर्णपणे रोखणार असल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. यामुळे रशियाला 630 अब्ज डॉलर्सचे नुकसा होणार आहे.
रशिया मंदीच्या उंबरठय़ावर
निर्बंधांमुळे रशियात अराजकतेचे वातावरण तयार झाले असून देश लवकरच मंदीच्या तावडीत सापडू शकतो. रशिया एका संकटसदृश स्थितीला सामोरा जातोय. रशियातील सर्व लोक स्वतःच्या पैशांसाठी बँकांमध्ये धाव घेत आहेत. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदार रशियातील गुंतवणूक काढून घेत आहेत.
रशियाचे चलन कोसळले
रुबलला विदेशी चलनात बदलण्याचा प्रकार आता रशियात मर्यादित होत चालला आहे. रुबलच्या बदल्यात विदेशी चलन मिळविण्याचा प्रयत्न लोक करत असले तरी त्यांना कुठलाच खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. युद्धापूर्वी 75 रुबलचे मूल्य एक डॉलर इतके होते. तर युद्ध सुरू झाल्यारव यात मोठी घसरण झाली आहे. एक डॉलरच्या बदल्यात आता लोकांना 113 रुबल द्यावे लागत आहेत. हे प्रमाण देखील वाढत चालले आहे. रुबलच्या घसरत चाललेल्या मूल्यामुळे रशियात अन्नधान्यापासून इंधनापर्यंत सर्व गोष्टींच्या किमती गगनाला भिडत आहेत. रशियात बेरोजगारी वाढण्याची चिन्हे असून तेथील सुपरमार्केट्स खाली होण्याची शक्यता आहे. रशियाचे लोक शक्य तितकी सामग्री खरेदी करत आहेत.









