प्रजासत्ताकदिनाचे औचित्य : हडपसर येथील ‘अमनोरा गेटवे टॉवर्स टी 100’ इमारतीवर ध्वज फडकणार
पुणे / प्रतिनिधी
यंदाचा 71 वा प्रजासत्ताकदिन पुणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय असेल अर्थात कारणही तसेच आहे. पुण्यात तब्बल 500 फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकविण्यात येत असून, तोही चक्क पुण्यातील मानवनिर्मित इमारतीवर. हडपसर येथील अमनोरा पार्क टाऊन येथील अमनोरा गेट वे टॉवर्स टी 100 ही मुंबई वगळता राज्यातील सर्वात उंच इमारत असून, या तब्बल 450 फूट (149.50 मीटर) उंच इमारतीच्या छतावर उभारलेल्या 60 फूट खांबावर हा 30 फूट बाय 20 फूट भव्य तिरंगा डौलाने फडकविण्यात येणार आहे. पुणे शहर आणि पर्यायाने भारताची विकासगाथा दर्शविणारी ही घटना ऐतिहासिक व आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.
यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्वांत उंच इमारतीवर (मुंबई वगळता) तिरंगा फडकवून हा एक नवा इतिहास रचला जात आहे. अशा पद्धतीची अत्याधुनिक व स्वयंपूर्ण टाऊनशिप उभारण्याच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या कामात खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्याच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करीत विस्तारणाऱया क्षितीजाचे दर्शन या अमनोराने उभारलेल्या गेटवे टॉवर्सच्या माध्यमातून होत आहे. अशा पद्धतीची इमारत ही केवळ अमनोरामध्येच असल्याने ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे, असेही देशपांडे यांनी नमूद केले.
अमनोरा गेटवे टॉवर्स टी 100 ही इमारत अमनोरा या सिटी कॉर्पोरेशतर्फे विकसित करण्यात येत असेलल्या टाऊनशिपमधील एक इमारत असून या इमारतीची उंची ही 150 मीटर इतकी आहे. या इमारतीमध्ये 43 मजले असून यामध्ये 173 सदनिका असतील. एक जबाबदार विकासक म्हणून राष्ट्रीय इमारत बांधकाम अधिनियमाच्या सर्व सूचनांचे पालन करीत आम्ही गेटवे टॉवर्सची उभारणी केली आहे. यामध्ये फायर टॉवर, फायर चेक फ्लोअर्स आणि रेफ्युजी एरिया भागात अत्याधुनिक फायर अलार्म आणि सस्पेंशन सिस्टिम्सदेखील बसविण्यात आल्या असल्याची माहितीही अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली.









