पुणे : भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली.
केदार म्हणाले, राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पुरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रीडा विषयक प्रगत अभ्यासक्रम राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक यांना करता यावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ असणे आवश्यक आहे, असेही केदार म्हणाले.
या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रारुप विधेयकास मंत्रिमंडळासमोर मान्यताही देण्यात आली आहे. विधानमंडळ अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम महाराष्ट्र मंजूर करण्यात आला आहे.








