ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अधिक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या अंतर्गत पुण्यात दिवसभर जमावबंदी आणि संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत आठवडाभर संचारबंदी असणार आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिली.
ते म्हणाले, बस सेवा, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील 7 दिवसांसाठी हे नियम लागू असतील. तसेच संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
पुढे ते म्हणाले, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला 100 टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावे लागेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
बैठकीत घेतलेले अन्य निर्णय :
- पुण्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट 7 दिवसांसाठी पूर्णपणे बंद असतील. मात्र, हॉटेलमधून होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील.
- पुणे पीएमपीएल बससेवा पुढील 7 दिवसांसाठी बंद राहतील.
- पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील.
- मॉल आणि चित्रपटगृहे पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील.
- लग्न आणि अंत्यविधी सोहळा वगळता सर्व सामाजिक कार्यक्रमांवर बंदी.
- आधीपासून ठरवले विवाह सोहळे 50 यांच्या उपस्थितीत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- अंत्यविधीसाठी वीस जणांची परवानगी असेल.
- सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी असेल.
- जिम आणि उद्याने सकाळच्या वेळेत सुरु .
- दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होतील.
- शाळा महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहेत.