ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याच्या येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात एका निर्माणाधीन मॉलच्या स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून पाच कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडय़ाच्या शास्त्रीनगर परिसरात ब्ल्यू ग्रास अलुवलीया या कंपनीकडून नोप्रोनिया नावाच्या मॉलचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी या लोखंडी जाळीवर वरच्या बाजूने आठ व खालच्या बाजूने आठ कामगार काम करत होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ही जाळी अचानक कोसळली. या जाळीखाली 10 कामगार दबले होते. दोन तासांच्या प्रयत्नानंतर या जळीखाली अडकलेल्या सर्व दहा कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे दु:ख झालं. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील, असे पीएमओ कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.