गहुंजे येथील स्टेडियमवर रंगणार तीन सामने
प्रतिनिधी / पुणे
कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये वनडेचा थरार पहायला मिळणार आहे. तीन वनडे मॅचेसच्या मालिकेला आजपासून (मंगळवार) सुरुवात होणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हे तिन्ही सामने रंगणार आहेत. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कसोटी आणि टी-20 मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी करून इंग्लंडला पराभूत केले होते. अशीच अपेक्षा वनडे मालिकेमध्ये सुद्धा केली जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला.
भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे म़िश्रण आहे. टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱया सूर्यकुमार यादवला वनडे मालिकेत संधी देण्यात आली आहे. तसेच विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत सात सामन्यात 14 विकेट मिळविणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा संघातला नवा चेहरा असणार आहे. त्याचबरोबर कृणाल पंडय़ाला स्थान देण्यात आले आहे. भारताची फलंदाजी हीच कायम जमेची बाजू ठरत आलेली आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा अशी भक्कम भारताची फलंदाजी आहे. भुवनेश्वर कुमार, महम्मद सिराज, टी-नटराजन, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल अशी गोलंदाजीची फळी असणार आहे. केएल राहुललाही टी-20 स्पर्धेत अपयशी ठरला असूनही त्याला एकदिवसीय सामन्यामध्ये संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, इंग्लंडमध्ये जेसन रॉय, बटलर, बेअरस्टो, बेन स्टोक्स, इयॉन मॉर्गन, सॅम बिलिंग्स, सॅम करन, डेविड मलान अशा फलंदाजांचा भरणा आहे, तर मार्क वूड, आदिल रशिद, मॅट पार्किन्सन, टॉम करन हे गोलंदाचीची बाजू सांभाळतील.
आर्चर आऊट, इंग्लंडला धक्का
वनडे मालिकेतून इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. आर्चरला उजव्या हाताच्या कोपऱयाला दुखापत झाली असल्याने तो संपूर्ण मालिकेतून बाद झाला आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला धक्का बसला आहे. दोन्ही संघातील फलंदाजीची ताकद पाहून ही मालिका चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे.
ही वनडे मालिका युवा खेळाडूंसाठी उत्तम संधी ः मॉर्गन
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर स्वतःचे नाणे खणखणीत वाजवण्यासाठी भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका आपल्या युवा खेळाडूंसाठी उत्तम संधी असेल. हे दोन्ही क्रिकेट प्रकार विभिन्न असले तरी त्यातील परिस्थिती जवळजवळ समसमानच असते. त्यामुळे, येथे युवा खेळाडूंकडून आपल्याला बऱयाच अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनने सोमवारी केले.
पाहुण्या इंग्लिश संघाने भारताच्या या दौऱयात कसोटी व टी-20 मालिकेत नामुष्कीजनक पराभव पत्करले असून विद्यमान वनडे विश्वचषक विजेते या नात्याने वनडे क्रिकेट प्रकारातील आपली हुकूमत अधोरेखित करत या दौऱयाचा सकारात्मक समारोप करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. ‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी लाभणे कोणत्याही खेळाडूसाठी विशेष महत्त्वाचे असते. यामधूनच स्वतःला सिद्ध करण्याची संधी लाभते. त्यामुळे, आता जे संघात असतील, त्यांच्यासाठी ही उत्तम सुसंधी असणार आहे’, असे मॉर्गन याप्रसंगी म्हणाला.
टी-20 वर्ल्डकपमध्ये मी-रोहितच सलामीला उतरु असे नाही ः विराट
इंग्लंडविरुद्ध पाचव्या वनडे सामन्यात नियमित सलामीवीर रोहित शर्मासह दस्तुरखुद्द विराट कोहली सलामीला उतरला, त्यावेळी अवघ्या क्रिकेट वर्तुळाच्या भुवया उंचावल्याशिवाय राहिल्या नाहीत. अर्थात, ही जोडी केवळ सलामीला उतरलीच नाही तर त्यांनी सामना जिंकून देण्यात सिंहाचा वाटा देखील उचलला. याचमुळे आता आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतही रोहित-विराट अशीच जोडी सलामीला उतरावी, अशी चर्चा सुरु झाली. स्वतः विराटने मात्र अद्याप अशी खात्री देता येणार नाही, असे म्हटले आहे. सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू आजमावून पाहण्याचा आपला पहिला प्रयत्न असेल, असे विराट याप्रसंगी म्हणाला आहे.
रोहितने नमूद केल्याप्रमाणे ही विलक्षण चाल होती. मात्र, आम्ही दोघांनीही त्यावेळी फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला. पण, सध्या सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू सलामीला उत्तम कामगिरी करत आहेत आणि मी माझ्या नेहमीच्या तिसऱया किंवा चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरणे पसंत करेन’, याचा विराटने पुढे उल्लेख केला.
आज सलामीला रोहित व शिखर धवन ही जोडी उतरेल, असेही विराटने येथे स्पष्ट केले. भारताने या वनडे मालिकेसाठी सूर्यकुमार, कर्नाटकचा जलद गोलंदाज एम. प्रसिद्ध कृष्णा व कृणाल पंडय़ा यांना संधी दिली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करण, टॉम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, अदिल रशिद, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड. राखीव ः जेक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून.









