ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेने शहरातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
ते म्हणाले, पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरातील महापालिकेच्या आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आहे. ते म्हणाले, 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारने नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यास मान्यता दिली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या पातळीवर निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचे वातावरण पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून आधीच माहिती देण्यात आली आहे. या लाटीला परतून लावण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. आगामी संकट लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.