ऑनलाईन टीम / पुणे :
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या मागे आई-वडील,पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. पांडुरंग यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी घटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्यांचे आज निधन झाले.
- अजित पवारांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे या घटनेचा अहवाल मागितला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, पांडुरंग रायकर यांचे निधन ही निश्चित दु:खदायक घटना आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.








