पुणे / प्रतिनिधी :
देशाच्या तुलनेत पुण्यात कोरोनाचे संक्रमण जलद गतीने होत आहे. देशभरात २३ कोरोनाचाचणींमागे १ पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहे, तर पुण्यात हीच संख्या ९ चाचण्यांमागे १ एवढी असल्याचा अहवाल केंद्राने जाहीर केला. तसेच ७ दिवसांत पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली असून, देशाच्या इतर भागाच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याचे केंद्रीय पथकाने म्हटले आहे.
मुंबई-पुण्यासारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्राच्या पथकाने पुणे-मुंबई दौरा केला असून, अधिक बाधित क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच त्यांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या. पुणे दौऱ्यावर असलेल्या या पथकाचा अहवाल दिल्लीत जाहीर करण्यात आला. त्यामध्ये रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
डॉक्टर, पोलीस, भाजीपाला विक्रेते आणि दुकानदार अनेकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनी जास्तीत जास्त सुरक्षा विषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा व्यक्ती सायलेंट कॅरिअर ठरतील. त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढेल, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले.









