बेंगळूरच्या एनसीबीची कारवाई हैदराबामध्ये : 5 जणांना अटक
प्रतिनिधी /बेंगळूर
ड्रग्जची बेकायदा वाहतूक करणाऱयांविरुद्ध कारवाई सुरूच असून सोमवारी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) पुण्याकडे वाहतूक होणारा सुमारे 15 कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना बेंगळुरात आणण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे.
ट्रकमधून सुमारे 2 हजार किलो गांजाची पुण्याकडे वाहतूक होत असल्याची माहिती बेंगळुरातील एनसीबीच्या अधिकाऱयांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱयांनी हैदराबादमधील अमीरपेठ टोल प्लाझाजवळ गांजा वाहतुकीचा ट्रक अडवून पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईवेळी गांजासह ट्रकही जप्त करण्यात आला आहे. सदर गांजा ओडिशाहून पुण्याला नेण्यात येत होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीवेळी उघडकीस आली.
याप्रकरणी महाराष्ट्रातील के. काळे, एस. काळे, सी. काळे आणि बी. धोरल्कर यांना अटक करण्यात आली आहे. दोन किलोची गांजाची 1,080 पाकिटे तयार करून बॉक्समध्ये पॅक करून ट्रकमधून नेण्यात येत होते, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा बेकायदेशीरपणे गांजा वाहतूक केल्याची माहिती अटकेतील आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.









