ऑनलाईन टीम / पुणे :
इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यामधील कोंढवा परिसरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकाला अटक केली आहे.
तल्हा खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मागील वर्षी आयसिससाठी काम करणाऱ्या जोडप्याला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली होती. त्या जोडप्यासोबत खान काम करत असल्याचा संशय एएनआयला होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी कोंढवा येथील तल्हा खानच्या घरावर एनआयएने छापेमारी केली. यामध्ये त्यांना काही महत्वाची कागदपत्रे आणि डिजीटल स्वरुपातील साहित्य सापडलं आहे. हे सर्व साहित्य एनआयएने ताब्यात घेतलं आहे. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासना या संघटनेचा हस्तक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून आयसिसची विचारधारा पसरवण्याचा कट रचणे, आयसिससाठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे हे प्रमुख आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.








