ऑनलाईन टीम / पुणे :
आर्थिक संकटात असलेल्या समाजातील अनेक घटकांना दानशूरांनी मदतीचा हात दिला. गणेशोत्सवात देखील समाजासाठी अखंडपणे कार्य करणा-यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्राहक पेठेतर्फे समाजातील ख-या योद्धयांना विघ्नहर्ता गणेशाची भेट देण्यात आली. सुमारे 221 शाडूच्या गणेश मूर्ती समाजातील या घटकांना देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला.
ग्राहक पेठेच्या खजिना विहीर चौकातील केंद्रामध्ये शाडूच्या 221 गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. विघ्नहर्ता गणेश या केंद्राचे उद्घाटन व उपक्रमाचा शुभारंभ खडक पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अनंत दळवी, शैलेश राणिम, उदय जोशी आदी उपस्थित होते. पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, बँड वादक, पुरोहित, लिज्जत पापडचे कामगार, वस्ती विभागातील कार्यकर्ते, मंडप कामगार, तुळशीबागेतील कर्मचारी आदींना गणेश मूर्ती विनामूल्य देण्यात आल्या आहेत.
चंद्रकांत लोहकरे म्हणाले, कोरोनाच्या काळात पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार यांसह अनेकांनी लढा दिला. गेल्या पाच महिन्यांमध्ये प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली असून अशी अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे गणेशोत्सव साजरा करण्याकरीता देखील पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच कृतज्ञता भेट म्हणून ग्राहक पेठेतर्फे गणेश मूर्ती देण्याचा केलेला उपक्रम अभिनंदनीय आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, समाजातील विविध घटकांचा कृतज्ञता सन्मान करण्याकरीता आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे. पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, बँड वादक, पुरोहित यांनी या केंद्रामध्ये येऊन आवडेल ती गणेशमूर्ती घ्यावी आणि त्याची स्थापना या उत्सवात घरी करावी, ही यामागील संकल्पना आहे. अनेकांकडे उत्सव साजरा करण्याकरीता पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे त्यांना ग्राहक पेठ ही शाडूची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती भेट देत आहे.








