वाकरे / प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदार संघातून विधानपरिषद निवडणुकीसाठी श्रीराम जुनियर कॉलेज, कुडीत्रेचे प्रा.जयंत आसगावकर यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली असून राष्ट्रीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी ट्विटद्वारे ही उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदनिवडणुकीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात पुणे ,सांगली,सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून सुमारे साठ हजार मतदार नोंदणी झाली आहे.या जागेसाठी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली,सोलापूर या जिल्ह्यातून अनेक उमेदवार इच्छुक होते.या इच्छुक उमेदवारांची कोल्हापूर येथे काँग्रेस समितीमध्ये शुक्रवार दि.६ रोनी महाराष्ट्राचे प्रभारी पाटील एच.के .पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. कोल्हापुरातून विधान परिषदेसाठी ,प्रा-जयंत आसगावकर ,बाबा पाटील, दादासो लाड, खंडेराव जगदाळे यांनी उमेदवारी मागितली होती.
प्रा.आसगावकर यांच्या पाठीशी माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षण संस्था चालक संघटना यांची साथ लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार होते .काँग्रेस कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी ट्विटद्वारे मंगळवारी ही उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पाच जिल्ह्यातून जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र यामध्ये प्रा. आसगावकर यांचे पारडे जड ठरल्याने उमेदवारी मिळाली आहे. प्रा.आसगावकर यांनी आज मंगळवारी पुणे महसूल विभाग कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आसगावकर यांना उमेदवारी मिळाल्याचे समजतात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेली ३३ वर्ष प्रा.आसगावकर हे श्रीराम जुनियर कॉलेज कुडित्रे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .ते कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक संघटनेचे सचिव असून शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे ते घटक आहे. कोजीमाशी पतसंस्था, कोजीमाशी पतपेढी ,कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, तांत्रिक शिक्षक संघटना अशा अनेक संघटनांमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी ट्विटद्वारे प्रा. जयंत आसगावकर यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे .
Previous Articleमुंबकेतील दाऊदच्या दुमजली बंगल्यास ११ लाख ३० हजाराची बोली
Next Article सोलापूर : अनैतिक संबंधातून मुलीनेच केला आईचा खून









