प्रतिनिधी / बांदा:
पुणे येथे मास्टर क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ११ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत येथील एम क्रिकेट अकादमीने नेत्रदीपक कामगिरी करत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत मुंबई, पुणे येथील मातब्बर संघ सहभागी झाले होते. एम अकादमीच्या संघाने लीग सामने तसेच अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.
या स्पर्धेत मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर हा पुरस्कार आरव मल्होत्रा याने पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पराग आराबेकर तर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून राहुल नेवगी यांना गौरविण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत उस्मा खान, भगवान पांढरे, सोहम सावंत यांनी अप्रतिम गोलंदाजी करत लक्ष वेधून घेतले. तर फलंदाजीत कर्णधार फुदेल आगा, राहुल नेवगी, अथर्व तोरसकर, यश पाटकर यांनी चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर अकादमीच्या प्रसाद नाईक, रुद्रेश पावसकर, दत्ता नाईक, पृथा आरेकर यांनीही सांघिक खेळाचे प्रदर्शन घडविले.
या खेळाडूंना विशेष १२ दिवस प्रशिक्षण घेऊन श्री पीटर यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक म्हणून जॅक आलमेडा यांनी जबाबदारी पार पाडली. अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक व उपाध्यक्ष अक्रम खान यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.









