ऑनलाईन टीम / पुणे :
आपला गणपती शारदा गणपतीचा जयघोष….फुलांच्या आकर्षक पायघड्या….मंत्रोच्चाराचे मंगमय सूर आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला.
पुष्पहारांनी सजविलेल्या आणि कलशाची प्रतिकृती असलेल्या गजकुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीला सायंकाळी 7 वाजता कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले. महाराष्ट्रभरातील शारदा गजाननाच्या भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने हा विसर्जन सोहळा अनुभविला.
यंदा 127 व्या वर्षात प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने मंदिरातच उत्सव साजरा करण्यात आला. मिरवणूक टाळून मंदिरातच प्रतिष्ठापना आणि मंदिर परिसरातच विसर्जन करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, विश्वस्त देविदास बहिरट, विश्वास भोर, विकी खन्ना, राजेश करळे उपस्थित होते. सुरज थोरात, अजय झवेरी, संकेत मते, नारायण चांदणे, प्रणव मलभारे, संकेत तापकीर, ओम थोरात, आशिष थोरात यांनी उत्सवाकरीता विशेष परिश्रम घेतले.
अण्णा थोरात म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वप्रथम अखिल मंडई मंडळाने घेतला. त्याला पुण्यातील गणेश मंडळानी प्रतिसाद देत साधेपणाने आणि मंदिरातच उत्सव साजरा केला, याबद्दल सर्वांचे आभार. यासोबतच गर्दी न करता गणेशभक्तांनी केलेले सहकार्य देखील अतिशय मोलाचे आहे.
दरवर्षी उत्साहात आणि सर्व जाती धमार्तील लोकांना सामावून घेऊन अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत असतो. 127 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मंदिर परिसरात विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी कोरोनाला हरवून पुढच्या वर्षी अधिक जोमाने गणरायाचे स्वागत करु, असेही त्यांनी सांगितले.








