कागल पंचतारांकित एमआयडीसी-लक्ष्मीटेक येथे उभारणी : उचगाव, गोकुळ शिरगाव येथे ब्रिजही उभारणार : वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका होणार कमी
प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत (एमआयडीसी)-लक्ष्मीटेक येथे लवकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर याच महामार्गावर उचगाव, गोकुळ शिरगाव एमआयडीसी-कणेरीवाडी फाटा ब्रिजचीही उभारणी होणार आहे. या ठिकाणी सातत्याने होत असलेली वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची भीषणता पाहून जागर फौंडेशनचे अध्यक्ष बी. जी. मांगले यांनी नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) उड्डाणपूल आणि अंडर ग्राऊंड आणि ओव्हरपास ब्रिजच्या उभारणीची मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे. नॅशनल हायवे ऍथॉरिटीचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांनी पाठविलेल्या पत्रात मागणी संदर्भात मंजुरी दिल्याचे म्हटले आहे.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते कागल मार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे. या प्रकल्पात मांगले यांनी केलेल्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्प संचालक पंदरकर यांनी पाठविलेल्या पत्रात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे 95 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचबरोबर उचगाव येथील अंडर ग्राऊंड ब्रिजसाठी 20 मीटर लांबीचा व 5.5 मीटर रूंदीचा भुयारी मार्ग बनविण्यात येणार आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसी-कणेरीवाडी फाटा येथील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी 2 मीटर लांबीचा आणि 15.10 मीटर उपरी मार्ग (ओव्हरपास) प्रस्तावित करण्यात आला आहे.
जागर, भारत प्रभात पार्टीच्या मागणीला यश
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव येथील अंडरग्राऊंड ब्रिज, गोकुळ शिरगाव एमआयडीसी – कणेरीवाडी फाटा यांना जोडणारा महामार्गावरील ओव्हरपास ब्रिज आणि कागल एमआयडीसी लक्ष्मीटेक महामार्ग चौकात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात यांचा विचार करून जागर फौंडेशनचे बी. जी. मांगले यांच्यासह भारत प्रभात पार्टीचे भिमराव गोंधळी, सनी गोंधळी, प्रल्हाद गोंधळी, संदीप गोंधळी आदी कार्यकर्त्यांनी सातत्याने नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे पत्रव्यवहार केला होता. पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
तीन पुलांच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. निवेदने दिली. पाठपुरावा केला. आता मंजुरी मिळाल्याने नागरिकांची वाहतुकीची कोंडी आणि अपघातापासून सुटका होईल. उंचगावचा अंडरग्राऊंड ब्रिज (बोगद्यासारखा) अजून मोठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतर पाठपुरावा करणार आहोत. -बी. जी. मांगले, अध्यक्ष जागर फौंडेशन, कोल्हापूर









