प्रतिनिधी / निपाणी
तब्बल चार दिवसानंतर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी सकाळी 11 पासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अद्याप मालवाहू अवजड वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर यमगर्णी पुलावर वेदगंगा नदीचे पाणी आले होते. महामार्गावर दहा फुटांपर्यंत पाणी असल्यामुळे वाहतूक गुरुवारी रात्रीपासून बंद करण्यात आली होता.
दरम्यान सोमवारी सकाळी महामार्गावरील पाणी कमी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण व पोलिस विभागाने यमगर्णी पुलावर भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सकाळी 11 पासून महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. सध्या कोल्हापूरहून बेळगाव कडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक सुरू आहे. मात्र बेळगाववरून कोल्हापूरच्या दिशेने मार्ग जाणारा मार्ग अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या बाजूला यमगर्णी ते निपाणी पर्यंत सहा किलोमीटरपर्यंत वाहन अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आणखी काही वेळानंतर अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.









