वार्ताहर / गोकुळ शिरगाव
उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, या गावांना जोडलेले अंडर पास ब्रिज वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करत असून या बोगद्याची लांबी-रुंदी वाढविण्याची व तसेच फाईव्ह स्टार एमआयडीसीवरील लक्ष्मी टेक येथे उड्डाणपूल व कनेरीवाडी मुख्य हायवे वर उड्डाणपूल, गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्यावर नव्याने उड्डाणपूल करण्याची मागणी जागर फौंडेशनच्या वतीने निवेदनव्दारे प्रकल्प संचालक व्ही.डी.पंदरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उंचगाव बोगदा रुंदीकरण,गोकुळ शिरगांव ते कणेरी ब्रिज रुंदीकरण होण्याची गरज आहे. उंचगाव बोगदा ज्या ठिकाणाहून कोल्हापूर- हुपरी राज्यमार्गवरून जातो.या मार्गावरील प्रचंड वाहतूक पाहता हा बोगदा ) अत्यंत अरुंद केला गेला आहे. त्यामुळे दररोज या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे असंख्य वाहने तासन – तास खोळंबून उभी राहतात. सदर बोगद्याची रुंदी किणी- वाठारजवळ वारणेकडे जाणाऱ्या फ्लाय ओव्हरसारखी करण्यात यावी. गोकुळ शिरगाव एमआयडीसीतून कणेरीकडे जाणारा ब्रीज सिंगल असल्यामुळे या ब्रीजवर देखील वाहतुकीची कोंडी होते.
या पुलाची रुंदी किमान डबल करून दुपदरी वाहतूक सुरू होईल एवढ्या आकाराची कमान बांधण्यात यावी. फाइव्ह स्टार एमआयडीसी मधून मुख्य हायवेवर येणारी वाहतूक व सुसाट वेगाने येणारी वाहने यामुळे येथे ओव्हर ब्रीज नसल्यामुळे अपघाताची भिंती वाहनधारकांमध्ये सतत असते. शिवाय वाहतुकीची कोंडीही होते. लक्ष्मी टेक येथे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या व पुरेश्या लांबीचा ओव्हर ब्रीज बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.अशी मागणी बी.जी.मांगले यांनी जागर फौंडेशनच्या माध्यमातून केली आहे. या निवेदनावर भिमराव गोंधळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भारत प्रभात पाटील, सनी गोंधळी, प्रल्हाद गोंधळी, संदिप गोंधळी यांच्या सह्या आहेत.









