पुलाची शिरोली / वार्ताहर
नातेवाईकांच्या लग्न समारंभास जात असताना हिरोहोंडा मोटारसायकललला ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तीचे वडील व मुलगी जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गावरील टोप कासारवाडी फाटा येथे घडला. याबाबतची फिर्याद वडील रामचंद्र पोवार यांनी शिरोली पोलिसात दिली आहे.
पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप कासारवाडी फाटा येथे पुणेहून कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीत स्क्रॅप घेवून जाणारा ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील सुमित्रा मोहन पुदाले (वय ३० रा. कोरेगाव ता. वाळवा जि. सांगली) या ट्रकच्या चाकात सापडून जागीच मृत्यू झाला. तर तीची मुलगी तनिष्का पुदाले (वय ५) वडील रामचंद्र पोवार (वय ६० रा वरणगे पाडळी ता. करवीर) हे जखमी झाले.
रामचंद्र पोवार हे मुलगी सुमित्रा हिला नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी कोरेगाव हून वरणगे पाडळी येथे माहेरी घेवून येत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने पोवार यांच्या मोटरसायकला धडक दिली यात सुमित्राचा मृत्यू झाला . याच मार्गांवरून जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे हे जात असताना हा अपघात घडल्याने त्यांनी घटनास्थळी भेट देवून माहीती घेतली. शिरोली पोलिसानी ट्रक चालक शेरनबाब गणीहूसेन फकिर रा. कोरेगाव ता. वाळवा जि. सांगली यास ताब्यात घेतले आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे .









