वार्ताहर / पुलाची शिरोली
कंटेनरची मोटर सायकलला पाठीमागून धडक बसून मोटारसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातात मोटरसायकलने पेट घेतला व जळून खाक झाली. हा अपघात पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मनुग्राफ कंपनी समोर गुरुवारी दुपारी दोन वाजता झाला.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आकाश पाटील रा. केखले. ता. पन्हाळा हे मोटारसायकल वरून कामानिमित्त कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान ते शिरोली औद्योगिक वसाहतीतील मनुग्राफ कंपनी जवळ आले असता, पुण्याहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची मोटर सायकलला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत मोटारसायकल रस्त्यावरून खर्चटत गेल्यामुळे मोटरसायकलने पेट घेतला. या अपघातात मोटरसायकल वरील महिला व पुरुष असे दोघे जण जखमी झाले.
यापैकी आकाश पाटील हे एकच नाव समजले आहे. पण महिलेचे नाव समजू शकले नाही. जखमींना तात्काळ कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. तर कंटेनर चालक पळून गेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पटेकर तपास करत आहे.









