ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरीता प्रशासनाकडून विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणजे आतापर्यंत विभागामध्ये अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे.
पुणे विभागात उपलब्ध असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा दररोज आढावा घेतला जातो. पुणे येथील मार्केटमध्ये विभाग विभागात 48 हजार 604 क्विंटल अन्नधान्याची आवक असून भाजीपाल्याची सरासरी आवक 9 हजार 953 क्विंटल, फळांची 1 हजार 97 क्विंटल तसेच कांदा / बटाट्याची 12 हजार 534 क्विंटल इतकी सरासरी आवक आहे. विभागात सरासरी 99.258 लाख लिटर दुधाचे संकलन होत असून सरासरी 22.906 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण होते. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात येते.
स्थलांतरित मजुरांसाठी विभागात 1254 निवास केंद्रे
स्थलांतरीत मजुरांच्या निवास व भोजन पुरवठयासाठी विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 142 व साखर कारखान्यामार्फत 1112 असे एकूण 1254 निवास केंद्रे उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 1 लाख 27 हजार 304 स्थलांतरीत मजूर असून, एकूण 1 लाख 99 हजार 836 मजुरांना भोजन देण्यात येत आहे.








