प्रतिनिधी / कोल्हापूर
सध्या सर्वत्र पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व करावे असे आपणा सर्वांनाच वाटते. अनेकजन इच्छुक असताना अचानक माझे नाव पदवीधर मतदारसंघासाठी दावेदार म्हणून लोकांसमोर येणे ही बाब खरंतर माझ्यासाठीही धक्कादायक अशीच म्हणावी लागले. तथापि मी आजघडीला तरी इच्छूक नाही. योग्य वेळी बोलुया, सबुरीने घ्या असा सल्ला भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी समाजमाध्यमातून समर्थकांना दिला आहे.
सुरुवातीला समाजमाध्यमांवरुन चालू झालेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष केले पण आता ही चर्चा अधिकच जोर धरू लागल्याने मी माझी भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. असे सांगत त्या म्हणतात, आज हितचिंतकांना इथे सांगू इच्छिते की, तुम्हा सर्वांच्या इच्छेचा मी निश्चित आदर करते पण पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा माझा मानस नव्हता आणि तो आजही नाही. त्यामुळे या सर्व चर्चा ऐकून, बातम्या वाचून कोणीही संभ्रमित होऊ नये. एखाद्या निवडणुकीसाठी जर मी इच्छुक असेन तर निश्चित तसे मत उघडपणे आपल्या सर्वांसमोर व पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त करेन. भाजपा हा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे, आपल्या पक्षामध्ये स्पष्ट मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे छुप्या चर्चा करण्यात अर्थ नाही.
भारतीय जनता पक्षाकडे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करू शकतील असे अनेक सक्षम उमेदवार आहेत. चंद्रकांतदादांनी अतिशय उत्कृष्टपणे या मतदारसंघाचे नेतृत्व केल्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे. अनेकांनी खूप कष्ट घेऊन या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीसुद्धा केली आहे. त्यापैकी योग्य त्या उमेदवाराला पक्षाने संधी द्यावी. निश्चितच पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही सर्वच पदाधिकारी व नेतेमंडळी चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली झोकून देऊन काम करू असे म्हटले आहे. महाडिक यांनी ही अधिकृत भूमिका जाहीर केल्याने पदवीधर मतदार संघातून भाजपकडून शौमिका महाडिक या चर्चेला तुर्तास विराम मिळाला आहे.









