ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात मागील चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत, त्यामुळेच या धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडले जात आहे. त्यातच पुण्याजवळील खडकवासला धरण भरल्यामुळे, धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोडल्यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरात असलेला बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे.

खडकवासला धरणातून रात्री उशिरा 2500 क्युसेसने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेक्कन येथील भिडे पूल येथे जलपर्णी अडकल्याने संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेले असून परीसरातील वाहतुक पोलीसानी थांबवली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्याना सावधानतेचा इशारा दिला आहे. तर परीसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून गेल्या 12 तासात 0.70 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे 5 टीएमसीने पाणी साठा वाढला आहे.








