ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील आंबिल ओढ्यालगत असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी व पोलिसांविरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
महापालिकेने आज सकाळपासून या कारवाईला सुरुवात केली होती. मात्र, नागरिकांनी याला विरोध केला. तसेच महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून या ठिकाणी आता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या वेळी येथील रहिवाश्यांनी पालिकेने बिल्डरच्या लेटरहेडवर नोटीस काढल्याचा आरोप देखील केला आहे. मात्र, सदर जागा ही पुणे महापालिकेची असून बिल्डर नोटीस कसा काय पाठवू शकतो?, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांना बिल्डरने नोटिस काढल्यानंतर महापालिकेनं कारवाई केली असल्याचा आरोपही स्थानिक करत आहेत. स्थानिकांच्या विरोधानंतरही पालिकेची कारवाई अजूनही सुरुच आहे. त्यामुळे पोलीस व स्थानिकांमध्ये झटापट झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
या अतिक्रमणामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे, असा आरोप काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. पुणे महापालिकेचे सत्ताधारी आणि बिल्डरचे लागेबंधे असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.गेले 15 दिवस महापालिका आयुक्त, एसआरए अधिकारी यांची भेट घेत आहे. 15 जुलैपर्यंत एसआरएच्या संदर्भातील तक्रारीसंबंधी वेळ देण्याची मागणी करत आहे. ओढ्यामागील परिसरातील कोणतेही स्थलांतर करण्यात आलेले नाही.
एसआरएसाठी जी जागा रिकामी करायची आहे तिथे अतिक्रमण आणि सुरक्षेच्या नावाखाली तुघलकी पद्धतीने कारवाई केली जात आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले की, ही कारवाई अचानक करण्यात आली नसून पूराची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन केले जायला हवे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.









