ऑनलाईन टीम / पुणे :
कोणताही महत्त्वाचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया जेवढया गतीने पुर्ण होईल, तेवढयाच गतीने प्रकल्प पुर्ण होतो. समृद्धी महामार्ग हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगून पुणे शहर तसेच राज्यासाठीही महत्त्वपूर्ण रिंगरोड प्रकल्प सर्व मिळून पुर्ण करूया, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे रिंग रोड तसेच पुणे -नाशिक रेल्वे जमीन मोजणी व मुल्यांकन कार्यपदधती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पुलकुंडवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, कोणताही महत्त्वाचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी जेवढया गतीने भूसंपादन प्रक्रिया पुर्ण होईल, तेवढयाच गतीने प्रकल्प पुर्ण होतो, हा आपला समृद्धी महामार्गाचा चांगला अनुभव आहे. प्रकल्प पुर्ण करण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना काय सेवा देणार आहोत, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. पुणे जिल्हयातील महत्त्वपूर्ण रिंगरोड प्रकल्पासाठी ज्या परवानग्या आवश्यक आहेत, त्या सर्व परवानग्या घेवूनच आपण पुढे जाणार असून पुणेकरासांठी सर्व मिळून हा प्रकल्प पुर्ण करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, रिंगरोड तसेच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी मुल्यांकनासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. पुणे महानगरासोबतच राज्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. रिंगरोड तसेच रेल्वे प्रकल्पासाठी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांचा पुढाकार महत्वाचा आहे. गावस्तरावरील यंत्रणेकडून सातत्याने प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.