पुणे/प्रतिनिधी
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना विषाणूचा धोका कमी झालेला नाही. दरम्यान, पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने पुण्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत. तर तज्ज्ञांनी पुढील दोन ते तीन महिन्यात देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. कोरोनावर मात करायची झाल्यास लसीकरण हा एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून देशात लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. दरम्यान देशात रशियाची स्पुतनिक व्ही लस दाखल झाली आहे. पुण्यातही या लशीचे ६०० डोस दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रात स्पुतनिक लसीचा पहिला डोस पुण्यात दिला गेला आहे. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका ३६ वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस देण्यात आली आहे. ही लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या एका कर्मचाऱ्याला दिली आहे. २८ जूनपासून पुणेकरांना स्पुतनिक व्ही ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे. पण ही लस घेण्यासाठी कोविन अॅप आणि पोर्टलवर पूर्वनोंदणी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.








