अध्याय सोळावा
या अध्यायाच्या पहिल्या भागामध्ये आपण नाथमहाराजांनी पहिल्या पंधरा अध्यायात काय काय सांगितलंय ते बघितलं. आता पुढील सोळा अध्यायात काय काय सांगणार आहेत ते पाहू. जेव्हा ग्रंथ खूप मोठा असतो तेव्हा तो वाचताना मागील व पुढील संदर्भ लागण्यासाठी ग्रंथाच्या मध्यावर असा आढावा घेण्याची गरज असते. त्यानुसार मागील आढावा घेतल्यानंतर पुढील अध्यायासंबंधी नाथमहाराज म्हणतात, सोळाच्या अध्यायात भगवंताच्या विभूतीचे निरूपण असून सतराव्या व अठराव्या अध्यायात वर्णाश्रमकांची माहिती व त्यांचे विधानाचे प्रकार, ह्यांचे निरूपण आहे. एकोणिसावा अध्याय गहन आहे. त्यात ज्ञाननिर्णयाचे माहात्म्य असून उद्धवाचे यमनियमादि प्रश्न ज्ञानात्मक उत्तरांसह सांगितले आहेत. त्या ज्ञानाच्या अधिकाराचा योग अज्ञान, ज्ञान आणि मध्यावस्था अशा तीन प्रकारांनी श्रीकृष्णांनी विसाव्या अध्यायांत सांगितला आहे. पुढे उद्घवाने गुणदोषांची अवस्था वेदांच्या माथ्यावर ठेविली, तेव्हा त्या वेदवादातील खरे खरे सात्त्विक निरूपण एकविसाव्यात सांगितले आहे.
त्याच वेदवादनिरूपणाच्या प्रसंगी तत्त्वांची एकंदर संख्या किती हा प्रश्न उद्भवला. तेव्हां श्रीकृष्णांनी त्या तत्त्वसंख्येचे यथार्थ निरूपण केले आहे. सर्व तत्त्वांचे विवेचन, प्रकृती आणि पुरुष ह्यांचे लक्षण आणि जन्ममरणांचे प्रकरण इतक्मयांचे निरूपण बाविसाव्यात केले आहे. दुसऱयाचे अपराध सहन करून स्वतः निरद्वंद्व राहावे अशा प्रकारचा भिक्षुगीतसंवाद तेविसाव्यामध्ये स्पष्ट केला आहे. अद्वैतामध्ये स्थिर होण्यासाठी चोविसाव्या अध्यायात सांख्यशास्त्र सांगितले. निर्गुणापासूनच गुणांची उत्पत्ती होते आणि गुणांचा क्षय झाला म्हणजे अखेर निर्गुणच शिल्लक राहते. आधी निर्गुण असते व अंतीही निर्गुणच असते. मध्ये मिथ्याच गुणांचा भास होतो. अशा या अद्वैतप्राप्तीसाठी सांख्यशास्त्राचे निरूपण केले आहे. ते मिथ्या गुण प्रवृत्तीयुक्त असतात, त्या तीन गुणांचा परस्परांत संबंध असतो आणि निर्गुणाच्या संबंधाने आत्मनि÷ा कशी ठेवावी, हे पंचविसाव्यात सांगितले आहे. सव्हीसाव्या अध्यायामध्ये अनुतापाची अनिवार शक्ती दाखविण्यासाठी पुरूरवा हा कामपाशात सांपडून उर्वशीचा उपभोग घेत असताही विरक्ति पावला ही कथा सांगितली आहे. भजनाचा विधी, मूर्तीचे लक्षण, वैदिक, तांत्रिक व मिश्र भजन म्हणजे काय, या उद्धवाच्या प्रश्नांचे संपूर्ण निरूपण सत्ताविसाव्यात आहे. मोठमोठय़ा योग्यांचे योगभांडार, गहन ज्ञानाने पूर्ण भरलेला, आत्मसुखाचे केवळ सारच, असा अठ्ठाविसावा अध्याय केवळ ज्ञानविषयानेच भरलेला आहे. त्याच अध्यायामध्ये ‘संसार हा असंभवनीय आहे’ असा उद्धवाने अत्यंत गहन प्रश्न केला होता, त्याचेही प्रत्युत्तर देवाने दिले आहे. अकराव्या स्कंधाचा केवळ कळस आणि भक्तिप्रेमाचे अत्यंत मनोहर स्वरूप, अशा प्रकारचा अत्यंत रसाळ असा भक्तीयुक्त ज्ञानोपदेश एकुणतिसाव्या अध्यायात आहे. त्याच्या पुढच्या दोन अध्यायात स्त्रीपुत्रादि साऱया कुळाचा घात प्रत्यक्ष डोळय़ांसमोर झाला असताही, जो ज्ञानाने समर्थ असतो, त्याचे चित्त यत्किंचितही डळमळत नाही हे श्रीकृष्णांनीच प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. ब्राह्मणांचा शाप अत्यंत कठीण असतो. त्या शापाने श्रीकृष्णाला सुद्धा पीडा झाली. मग इतरांची कथा काय ! ब्राह्मशापाने सर्व कुळाचे सुद्धा निर्दाळण होते. ब्राह्मणाचा कोप विलक्षण सामर्थ्यवान् असतो, सगळा समुद्रसुद्धा त्याने मूत्र करून सोडला! ब्राह्मणांच्या क्षोभाने एका निमिषार्धात शिवाचा सुद्धा लिंगपात झाला ! याकरिता सज्ञान असो की अज्ञान असो कोणीही ब्राह्मणांशी वैर करू नये. हेच दाखविण्याकरिता श्रीकृष्णांनी प्रसिद्ध असा कुलक्षय करवून दाखविला. स्वतः (श्रीकृष्णा) च्याच देहाचा ज्याने घात केला, तो जराव्याधही कृष्णाने मुक्त केला. येथपर्यंत ज्ञाता असतो तो देहातीत व क्षमाशील कसा असतो हे दाखवून दिले. एकोणतीस अध्यायापर्यंत श्रीकृष्णांनी ज्ञानाचा उपदेश केला. त्यापुढील दोन अध्यायात स्वतःची विदेह स्थिती दाखविली.
क्रमशः







