उमेदवारी स्वीकारण्यास तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन : डिचोलीसह तालुक्यातील तीनही मतदारसंघात भाजपच्या विजयाचा विश्वास
डिचोली/प्रतिनिधी
सभापती राजेश पाटणेकर यांनी उमेदवारी स्विकारण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आरोग्याच्या तक्रारिंमुळे त्यांनी जरी थोडा उशीर केला असला तरी त्यांची लोकप्रियता आणि स्वभाव यामुळे या निवडणुकीतही पाटणेकर हे निश्चितच बहुमताने निवडून येणार आहेत, एवढेच नव्हे तर पुढील सरकारात ते मंत्रीही असतील. गेल्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत डिचोली तालुक्मयातील तीनही मतदारसंघात भाजप निवडून येणार अशी खात्री आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्य़क्त केला आहे.
डिचोली मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा अखेर काल शुक्रवारी सुटला. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची यशस्वी शिष्टाई आणि पाटणेकर यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रह आणि विनंतीवरून अखेर राजेश पाटणेकर यांनीच डिचोली मतदारसंघात भाजपची उमेदवारी स्विकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून डिचोलीत भाजपच्या उमेदवारीवर सुरू असलेल्या नाटय़ावर अखेर पडदा पडला आहे. पाटणेकर यांनी उमेदवारी स्विकारल्याची घोषणा करताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले.
पक्ष, कार्यकर्त्यांच्या आग्रहाला दिला मान
सभापती राजेश पाटणेकर यांनी आरोग्याच्या व इतर काही विषयांवरून आपण निवडणूक लढवाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या घरी बुधवारी प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन त्यांनी निवडणूक रिंगणात उतरायलाच हवे, अशी गळ घालत निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असा भरवसा त्यांना दिला होता. गुरूवारी संध्याकाळी डिचोलीतील दिनदयाळ सभागृहात झालेल्या भाजप मंडळ, प्रमुख कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या बैठकीत पाटणेकर यांनी आपली असमर्थता दाखविताना निवडणूक लढणारच नाही असाच पवित्रा घेतला होता.
शुक्रवारी डिचोलीत वेगळेच राजकारण
काल शुक्रवारी सकाळी डिचोलीत वेगळेच राजकारण घडले. संपूर्ण राजकारणाला कलाटणी देताना मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव व आग्रह तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजेश पाटणेकर यांच्यावर उमेदवारी स्विकारण्यासाठी लावलेला तगादा या सर्वांना मान देत पाटणेकर यांनी अखेर उमेदवारी स्विकारली. पाटणेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला. थेट मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व राजेश पाटणेकर यांनी आपल्या कार्यकर्ते, नगरसेवक व इतरांसमवेत डिचोली छत्रपती शिवाजी महाराज मैदानासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर रिंगणात : पाटणेकर
डिचोली मतदारसंघात यावेळी आपण आरोग्य आणि इतर काही कारणांमुळे माघार घेत पक्षाने नवीन चेहऱयाला उमेदवारी देण्याची विनंती केली होती. परंतु आपल्या असंख्य कार्यकर्ते, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्या आग्रहाखातर आपण रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. डिचोलीत आपण नसल्यास पक्षाला विजय जड जाणार असे समीकरण असल्याने विरोधी उमेदवारांमध्ये सहज निवडून येण्याची भावना निर्माण झाली होती. त्याला शह देण्यासाठी सर्वांनी आपल्याकडे आग्रह धरला होता. त्या आग्रहाखातर आपण निर्णय बदलला आहे, असे यावेळी राजेश पाटणेकर यांनी सांगितले.
आपण पक्षाबरोबर ठाम राहणार : शिल्पा नाईक
आपण पक्षाची नि÷ावंत कार्यकर्ती असून पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडली आहे. डिचोलीत पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी आपण ठाम राहणार असून पाटणेकर यांच्या विजयसाठी झटणार आहे, असे शिल्पा नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.









