पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात ग्राम पंचायती निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विकास किंवा योजनांबाबत मी काहीही बोलणार नाही. तसेच मुख्यमंत्री बदलण्याबाबतच्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही. येणारी विधानसभा निवडणूकही बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असे स्पष्टीकरण पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे सांगितले.
कळसा-भांडुरा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे त्याबाबत मला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. यावेळी पत्रकारांनी गोव्याचे मुख्यमंत्री या प्रकल्पासाठीच राजीनामा देवू, असे सांगितले आहे. त्याबद्दल विचारले असता त्यांनी राजीनामा दिला तर मीही येथील राजीनामा देईन, असे स्पष्ट केले. जिल्हा विभाजनाबाबत विचारले असता काही तांत्रिक अडचणी आहेत. महाजन अहवालाचा उल्लेख करत पत्रकारांसमोर सारेच काही बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगून वेळ मारुन नेली.
जिल्हा पंचायतीचे काही सदस्य भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याबद्दल विचारले असता भाजपमध्ये येणाऱयांचे आम्ही स्वागत करु. मंत्रीमंडळ विस्तारामध्ये काँग्रसमधून आलेल्या 17 मधील काही जणांना मंत्रीपद मिळाले नाही. तेंव्हा त्यांना मंत्रीपद मिळण्यासाठी तुम्ही काय करणार? असे विचारले असता आम्हाला सर्वांनाच मंत्रीपद हवे आहे आणि ते नक्कीच मिळेल असे त्यांनी सांगितले.
जिह्यामध्ये कोरोनाबाबत आरोग्य विभागाने अधिक दक्षता घेतली आहे. कोरोनाच बराच आटोक्मयात आला आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. याचबरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र आचारसंहितेमुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









