वृत्त संस्था/ नवी दिल्ली
कोरोना समस्येमुळे राष्ट्रीय बॅडमिंटन हंगामाला प्रारंभ करण्यासाठी तब्बल 20 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. पण आता राष्ट्रीय बॅडमिंटन हंगामाला डिसेंबर महिन्यात प्रारंभ होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने बुधवारी केली. नव्या गुणपद्धतीचा यावेळी अवलंब केला जाणार आहे. या आगामी हंगामात वरिष्ठ तसेच मानांकन 3 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धा पाठोपाठ घेतल्या जाणार असून या हंगामात नव्या गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती फेडरेशनच्या अजय सिंघानिया यांनी दिली.
आगामी राष्ट्रीय बॅडमिंटन हंगामाला चेन्नईत 16 ते 22 डिसेंबर दरम्यान प्रारंभ होणार आहे. या पहिल्या स्पर्धेनंतर हैदराबादमध्ये 24 ते 30 डिसेंबर दरम्यान तीन दर्जाची दुसरी बॅडमिंटन स्पर्धा खेळविली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 20 लाख रूपये राहील. चेन्नईत होणाऱया पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी इच्छुकांसाठी प्रवेश अर्जांची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर राहील. या दोन स्पर्धां झाल्यानंतर तेलंगणमध्ये तिसरी बॅडमिंटन स्पर्धा 1 डिसेंबरपासून खेळविली जाणार आहे.
वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धा तीन दर्जामध्ये विभागण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय बॅडमिंटन फेडरेशनच्या या 6 स्पर्धा प्रत्येक वर्षी घेतल्या जातील. दुसऱया दर्जाच्या विभागात अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या सुपर सिरीज बॅडमिंटनच्या 4 स्पर्धा प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे पहिल्या दर्जाच्या बॅडमिंटन संघटनेच्या प्रीमियर सुपर सिरीज बॅडमिंटनमधील दोन स्पर्धा प्रत्येक वर्षी घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक वर्षीच्या संपूर्ण राष्ट्रीय वरिष्ठांच्या मानांकन स्पर्धांसाठी एकूण 2.2 कोटी रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 50 लाख रूपये एकूण बक्षीस रक्कमेच्या तीन राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.









