महसूलमंत्री आर. अशोक यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुढील दोन महिने उद्घाटन किंवा कोनशिला समारंभांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये, अशी सूचना महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे. मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
बेंगळूरमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने आपण अधिकाऱयांची बैठक घेतली आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये कोविड चाचणीचे अहवाल उपलब्ध होत आहेत. मात्र, बेंगळूर महानगरपालिकेच्या कोविड वॉर रुमला यासंबंधीची माहिती दिली जात नाही. त्यामुळे माहिती न देणाऱया खासगी लॅबोरेटरिजना कारवाईचा इशारा दिला आहे, असे ते म्हणाले.
इस्पितळांमध्ये उपलब्ध असणाऱया बेडसंबंधीची माहिती पब्लिक डोमेनवर टाकण्यात येईल. त्यामुळे कोणत्या इस्पितळात किती बेड रिक्त आहेत. याविषयीची माहिती मिळेल. याबाबतही अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. आपण आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे. मंगळवारी रात्रीपासून राज्यात जनता कर्फ्यू जारी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडत असताना सुरक्षिततेबद्दलची काळजी घ्यावी, असे आवाहनही आर. अशोक यांनी केले.









