ऑनलाईन टीम / मुंबई :
शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत बोलताना केली. तसेच यापूर्वी वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीजसुद्धा पुर्ववत केली जाईल, असेही राऊत यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रकरणावरुन अधिवेशनात आज विरोधकांनी गदारोळ घातला. यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
महावितरणची ग्राहकांकडून येणारी थकबाकी 64 हजार कोटी इतकी आहे. यापैकी कृषी पंप धारक शेतकऱ्यांची थकबाकी 44 हजार 920 कोटी रुपये आहे. त्यामुळे महावितरणचाही विचार करावा लागतो. शेतकऱयांची वीज तोडणी आम्ही थांबवत आहोत. वीज ग्राहकांना विनंती आहे की, आम्ही सवलती देत असलो तरी तुम्ही तुमची बिले वेळेवर भरा.








