लहानपणापासून बघत आलोय. आमची पिढी गेली. मधली पिढी जाऊन नवी पिढी आली. पण काही बदल नाही. एखाद्या पुढाऱयाची सत्कार सभा असेल, त्याने आधीच्या पक्षाला शेंडी लावून नव्या पक्षात प्रवेशाचा स्वागत समारंभ असेल. आयुष्यभर एकमेकांवर शिवराळ भाषेत टीका करणारे पक्ष निवडणुकीसाठी, सत्तेसाठी एकत्र आल्याचा सोहळा असेल, त्यात एक कार्यक्रम हमखास असतो. पुढारी एकमेकांचे हात धरून व्यासपीठावर बारकुली साखळी करतात. एकेकांचे हात उंचावतात. मग त्यांना तलवारी भेट दिल्या जातात. पुढारी त्या तलवारी उंच करून-खरं म्हणजे उगारून दाखवतात! या तलवारी ते कोणावर उगारत असतात बरे? कार्यकर्ते त्यांना प्रतिकात्मक लढाईसाठी तलवारी भेट देत असतील तर निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून ढाली देखील का देत नाहीत?
हेच पुढारी आपल्या भाषणात देशाचा विकास, देशाला पुढे नेणे वगैरे बाता मारत असतातच. मग कार्यकर्ते त्यांना तलवारीबरोबर आणि नंतर विकसित झालेली शस्त्रे-उदाहरणार्थ भाला, बरच्या, संगीन, एके-47, रॉकेट लॉन्चर्स किंवा लुटुपुटीचे अणुबॉम्ब वगैरे का देत नाहीत? आणि नव्या काळात न येता प्राचीन काळातच यांना रमायचे असेल तर व्यासपीठावर येताना हे पुढारी आधुनिक कडक इस्त्रीचे कपडे आणि हातात मोबाईल घेऊन येण्याऐवजी अंगावर झाडांच्या सालीपासून बनवलेली वल्कले, पाठीवर बाणांचा भाता आणि डाव्या हातात धनुष्य घेऊन प्रकट का होत नाहीत?
डाव्या हातावरून आठवले. डावखुऱया पुढाऱयांना तलवार दिल्यावर त्यांची डाव्या हाताने तलवार उंचावली पाहिजे की नाही? पण ते उजव्या हाताने तलवार उंचावतात.
एका कार्यक्रमात पुढाऱयाने तलवार उंचावून दाखवताना चुकून उलटी धरली होती. ते असो. परवा मित्राला विचारलं, “आपण केस कापायला, चहा प्यायला किंवा पान खायला जातो, त्या दुकानात, हॉटेलात वगैरे ठिकाणी लिहिलेले असते की शब्द हे शस्त्र आहे. शाळेत देखील लेखणी तलवारीहून शक्तिमान असल्याचे आपल्याला शिकवले होते. सध्या लोकशाही आहे. मग या पुढाऱयांना कोणी तलवारीऐवजी पुस्तकं द्यायला काय हरकत आहे?’’
“त्यांनी स्टेजवर उलटी तलवार उंचावून दाखवली तसे पुस्तक उलटे धरून दाखवले तर लाज निघणार नाही?’’ मित्राने विचारले आणि मी निरूत्तर झाला.








