भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पुड्डुचेरीतील तिरुनेलौरमध्ये जी.एस.टी राजशेखर या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ रविवारी रोड शो केला आहे. 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात 30 जागांसाठी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे.
मतदानापूर्वी केंद्रशासित प्रदेशात 48 तासांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी क्षेत्रात कुठल्याही प्रकारे शांततेसाठी धोकादायक ठरणाऱया कारवाया रोखणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयांनी दिली आहे.
पुड्डुचेरीत 6 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीकरता 34 उमेदवार उभे आहेत. 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरता राखीव आहेत. केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेसाठी 10,02,589 मतदार उमेदवारांची निवड करणार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 16 आमदारांचे पाठबळ मिळवावे लागणार आहे. काँग्रेस येथे डावे पक्ष तसेच द्रमुकसोबत मिळून निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे भाजपने ऑल इंडिया एनआर काँग्रेस, अण्णाद्रमुक आणि अन्य पक्षांसोबत आघाडी करत काँग्रेससमारे तगडे आव्हान निर्माण केले आहे.









