ठावठिकाणाची माहिती न दिल्याने कारवाई, केएल राहुल, स्मृती मानधना, दीप्ती शर्माचाही समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, केएल राहुलसह 5 मध्यवर्ती करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना नाडाने (राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समिती) नोटीस जारी केली. सदर खेळाडूंनी आपल्या ठावठिकाणाबद्दल माहिती दिलेली नाही, असा नाडाचा ठपका आहे. नोटीस जारी केले गेलेल्या अन्य खेळाडूत महिला स्टार खेळाडू स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांचाही समावेश आहे. दरम्यान, नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांनी बीसीसीआयकडून याबाबत स्पष्टीकरण आल्याचा खुलासा केला.
‘आपल्या ठावठिकाणाबद्दल माहिती देण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तरी ऍडम्स (उत्तेजक प्रतिबंधक व्यवस्थापन) सॉफ्टवेअरवर नोंदणी करता येईल किंवा स्वतः खेळाडू किंवा त्याची संघटना ही माहिती भरु शकतो. काही क्रीडा प्रकारातील खेळाडू इतके शिक्षित नाहीत किंवा त्यांच्याकडे इंटरनेट उपलब्ध नाही व यामुळे ते स्वतः ही माहिती भरुन पाठवू शकत नाहीत. या खेळाडूंनी अशा परिस्थितीत आपल्या मंडळाचे सहकार्य घेणे अपेक्षित आहे’, असे अगरवाल म्हणाले.
यापूर्वी देशात लॉकडाऊन सुरु असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंच्या ठावठिकाणाची माहिती दिलीन नाही. त्यावर नाडाचा आक्षेप आहे. पासवर्ड एरर आल्याने आपण माहिती देऊ शकलो नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले. पण, या परिस्थितीत सदर 5 खेळाडू स्वतः ही माहिती का पुरवू शकले नाहीत, असा प्रश्न नाडाने उपस्थित केला आहे.









