डिचोलीत अखेर राजेश पाटणेकरच : सांताप्रुझ, कुठ्ठाळी, कुडतरीही जाहीर

प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाने गोव्यातील शिल्लक राहिलेल्या आपल्या सहा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले असून कुंभारजुवेतून विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जनिता मडकईकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा पुत्र सिद्धेश नाईक तेथे उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु, त्यांनाही डावलण्यात आले आहे. डिचोलीतून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
कळंगूट मतदारसंघातून नुकतेच भाजपवासी झालेले जोसेफ सिक्वेरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांताप्रुझमधून आंतोनियो फर्नांडिस, कुठ्ठाळीमधून नारायण नाईक तर कुडतरीमधून आंतोनियो बार्बोझा यांना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी दिल्लीतून सदर यादीची घोषणा केली आहे.
भाजपने यापूर्वी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता सहा उमेदवार घोषित करून भाजपने 40 उमेदवारांची यादी पूर्ण केली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रथमच विधानसभेच्या सर्व 40 मतदारसंघातून लढणार आहे. त्यामुळे युती करण्याचा किंवा अपक्षांना बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.









