अन्य 6 जवान जखमी, चौकशीचे आदेश
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिह्यातील मेंढार सेक्टरमध्ये रविवारी रात्री अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. यामध्ये दोन लष्करी अधिकाऱयांना प्राण गमवावे लागले. हुतात्मा झालेल्या दोघांची नावे कॅप्टन आनंद आणि जेसीओ भगवान सिंग अशी आहेत. त्याचबरोबर इतर 6 जवान जखमी झाले आहेत. एलओसीवर सेवा बजावत असताना हा स्फोट झाला. ग्रेनेडचा स्फोट कसा झाला याचा तपास सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिह्यातील मेंढार सेक्टरमध्ये एलओसीवर रविवारी रात्री भारतीय सैनिक आपले कर्तव्य बजावत असताना ग्रेनेडचा स्फोट झाला. हा स्फोट कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिले आहेत. या दुर्घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ विमानाने उधमपूरला नेण्यात आले. उपचारादरम्यान एक अधिकारी आणि एक जेसीओ यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात आले. अन्य सहा जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशयही व्यक्त केला जात असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
यापूर्वी रविवारी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील गंगू क्रॉसिंगजवळील चेकपोस्टवर हल्ला केला होता. गोळीबारावेळी येथे पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात होते. या घटनेत सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला असून त्याचे नाव एएसआय विनोद कुमार असे आहे. उपचारादरम्यान त्याला मृत जाहीर करण्यात आले होते.









