नवीन नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कुंकळ्ळी पालिकेचा सर्वांगीण विकास करण्याकामी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करताना स्वच्छ प्रशासन देण्याकडे आपला कटाक्ष राहील, असे नवीन नगराध्यक्ष डॉ. लक्ष्मण नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले. भ्रष्टाचार आणि पालिकेत गलथान कारभार मुळीच खपवून घेतला जाणार नसल्याचा सज्जड इशारा नाईक यांनी दिला आहे.
पालिकेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता तसेच कारभार ढासळला होता. याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत होता. पालिकेत आलेल्या नागरिकांची सहजासहजी कामे होत नसत. कैकदा हेलपाटे मारावे लागत. पालिकेतील कारभाराविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी आपण निवडणूक काळात ऐकल्याचे नाईक म्हणाले. यापुढे कोणत्याही कामात कर्मचारी वर्गाची हयगळ मुळीच खपवून घेतली जाणार नाही. कर्मचारी वर्गाने नियमांचे पालन करावे. वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. लोकांची कामे वेळेवर होतील याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. स्वच्छ कारभार देण्यास आपण प्राधान्य देईन, असे त्यांनी यावेळी सागितले. मागील मंडळाला योग्य विकास साधता आलेला नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी उपस्थित असलेल्या युरी आलेमाव यांनी आपल्या पॅनलला बहुमत देऊन पुन्हा एकदा आपल्यावर व ज्योकीम आलेमाव यांच्यावर पूर्ण विश्वास दाखविल्याबद्दल नागरिकांचे जाहीर आभार मानले. मतदारांनी चांगली संधी दिली आहे. कुंकळ्ळी पालिकेत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कुंकळ्ळीच्या विकासासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील. आपले वडील ज्योकीम आलेमाव यांनी कुंकळ्ळी शायनिंग धोरण राबविले. त्याच मार्गावरून कुंकळ्ळी पालिका मंडळ वाटचाल करून कुंकळ्ळीचा विकास घडवेल, असे ते म्हणाले.
ज्योकीम आलेमाव यांनी कुंकळ्ळीत भरपूर विकास केला. मात्र मागील मंडळाने दुर्लक्ष केल्याने काही प्रकल्पांची झालेली दुर्दशा पाहवत नाही. कदंब बसस्थानकाजवळच्या स्वातंत्र्यसैनिक स्मारकाच्या जवळ असलेल्या पार्कचे सौंदर्यीकरण करण्याचा ठराव पालिका घेणार असून त्याचा खर्च स्वतः आपण करणार असल्याचे आलेमाव यांनी जाहीर केले. पालिकेत जे भ्रष्टाचार चालला होता त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. नव्या मंडळाने नागरिकांना योग्य सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.









