काँग्रेसला दिली होती सोडचिठ्ठी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकणारे वरिष्ठ नेते पी.सी. चाको आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. चाको यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे.
काँग्रेस पक्ष ज्या संकटाला तोंड देत आहे, त्यावर चर्चा करणे आवश्यक आहे. सीताराम येच्युरी आणि गुलाम नबी आझाद यांची भेट घेत भविष्यातील स्वतःच्या योजनांसंबंधीही चर्चा करणार आहे. एलडीएफला (डाव्यांच्या नेतृत्वाखालील केरळमधील आघाडी) समर्थन देणार असल्याचे चाको यांनी म्हटले आहे.
चाको यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना स्वतःचे राजीनामा पत्र सोपविले होते. राजीनामा देताना चाको यांनी केरळ काँग्रेस आणि पक्षशेष्ठींवर अनेक गंभीर आरोप केले होते. एक प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कायम राहणे अवघड ठरले होते. योग्यतेची कुणालाच चिंता नाही. काँग्रेस पक्ष आता नावाडी नसलेली नौका ठरली आहे. एक वर्षापासून पक्षाला स्वतःचा अध्यक्षही निवडता आलेला नसल्याचे चाको यांनी म्हटले होते.









